लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मुलभूत सुविधा देण्यासाठी ३४९़ ३८ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यास गुरूवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली़ आयुक्तांनी आयत्या वेळी हा विषय स्थायी समितीला सादर केला होता़ महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी झाली़ या सभेला सभापती वालिबेन मंडोरे, उपायुक्त रविंद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ व सदस्य, अधिकारी उपस्थित होते़ सभेत विषयपत्रिकेवरील ११ विषय अवघ्या ५ मिनिटात वाचून मंजूर करण्यात आले़ त्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तातडीने पाठविलेल्या विषयाची माहिती नगरसचिव मनोज वाघ यांनी सभेत दिली़ त्यानुसार तो विषय स्थायीच्या सभेत मंजूर झाला़ ३४९़३८ कोटी रूपयांच्या प्रस्तावात डांबरी रस्ते, रस्त्यांचे नुतनीकरण, सिमेंट रस्ते, गटारी, संरक्षण भिंत, सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन व पथदिव्यांच्या कामांचा समावेश आहे़ तातडीच्या सर्वेक्षणानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी हद्दवाढीत गावांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचे देखील सर्वेक्षण लवकरच केले जाणार आहे़ दरम्यान, माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली़ त्यावर खुलासा करतांना सहायक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी यांनी, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी २ वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले़