धुळे : तालुक्यातील तरवाडेबारीत हॉटेलवर तालुका पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला़ या ठिकाणी बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना उद्ध्वस्त करण्यात येऊन पोलिसांनी दारूसाठ्यासह ४७ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोलिसांनी हॉटेलमालकासह चौघांना ताब्यात घेतले आहे़ याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़शिरुड परिसरातील तरवाडेबारीत असलेल्या ओम साईराम हॉटेलवर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला़ या ठिकाणी हॉटेलला लागून असलेल्या एका खोलीत बनावट दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले़ पोलिसांनी हॉटेल मालक समाधान बापू पाटोळे व मजूर बंटी उर्फ भावेश अशोक देसले, परमेश्वर निंबा पवार, राजु पंडित गोपाल यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून तयार दारूसह दारूच्या बाटल्यांना बूच लावण्याचे मशीन, दारू तयार करण्याची सामग्री जप्त करण्यात आली़ या कारवाईत दारू साठ्यासह एकूण ४७ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ ही कारवाई पोलीस अधीक्षक चैतन्या एस़, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आऱ बी़ मांडेकर, एस़ डी़ कोळी, सहायक उपनिरीक्षक साळवे, पो़ना. सोनार, पोक़ॉ. देसले, गवळी, कोठावदे यांनी केली़
हॉटेलमधील बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
By admin | Published: February 12, 2017 12:46 AM