तुषार देवरे -धुळे : धुळे तालुक्यातील देऊर खुर्द शिवारात सहा महिन्यांच्या बालिकेवर हल्ला केल्यानंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. मंगळवारी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकल्याने, ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, रेल्वेच्या धडकेत एक बिबट्या मृत पावला आहे.
देऊर खुर्द शिवारात सोमवारी पहाटे बिबट्याने पूनम भगवान हाळणर या सहा महिन्यांच्या बालिकेला उचलून नेले होते. मात्र, मुलीच्या रडण्याच्या आवाज आल्यानंतर हाळणर कुटुंब जागे झाले. तर मुलीच्या वडील व आजोबांनी केलेल्या आरडाओरडीमुळे बिबट्याने मुलीला शेतात सोडून धूम ठोकली होती. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावले. त्यात एक बिबट्या अलगद अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनीही मोकळा श्वास घेतला.
दरम्यान, एक बिबट्या जिवंत पकडला असताना धुळे-तालुक्यातील चांदे शिवारात एकवर्षीय बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.