आॅनलाइन लोकमतमालपूर, (जि.धुळे): शिंदखेडा तालुक्यातील देवकानगर येथे मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याची दखल घेत निवडणूक आटोपल्यानंतर लागलीच गावात मूलभूत सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.परंतु निवडणूक आटोपून आता १५ दिवस झाले तरी देवकानगरची स्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. प्रशासनाने ग्रामस्थांची दिशाभूल केली असा ग्रामस्थांचा आरोप आहे.दोंडाईचा-साक्री रस्त्यावर कर्ले गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर देवकानगर गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास ५०० असून, येथील ग्रामस्थांचा शेती व मेंढपाळ हाच व्यवसाय आहे.अनेक वर्षांपासून हे गाव मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पायवाटेनेच जावे लागते. पावसाळ्यात चिखल तुडवत ग्रामस्थांना गावात जावे लागत असते. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षक भिंतही नाही. संरक्षक भिंत नसल्याने शाळेला काटेरी झुडपांचे कंपाऊंड केलेले आहे. शाळेला संरक्षक भिंत बांधावी अशी ग्रामस्थांची मागणी असतांना त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. येथे अंगणवाडीसाठी इमारत नसल्याने, खाजगी घरातच अंगणवाडी भरत असते.येथील पाचवी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कर्ले, दोंडाईचा येथे शिक्षणासाठी जात असतात. मात्र रस्त्याची सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. गावात पाण्याची पुरेशी सोय नाही, आरोग्याचीही सोय नाही.येथील ग्रामस्थांचे रेशन दुकान कर्ले या गावी आहे. पूर्वी या ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानाचा लाभ मिळत होता. मात्र दोन-तीन वर्षापासून तेथील रेशन दुकानदारानेही रेशन देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानापासून लाभार्थी वंचीत आहेत.दरम्यान गावात मुलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात तसेच रेशनचीही व्यवस्था करून द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे.
धुळे जिल्ह्यातील देवकानगर मुलभूत सुविधांपासून वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:50 AM