धुळे : शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई करून अडीच लाखांचा ऐवज लांबविला. तसेच साक्रीतही चोरट्यांनी २५ हजारांचा ऐवज लांबविला. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाली असून पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील अंबालाल सखाराम कोळी (वय ४८) यांनी फिर्याद दाखल केली. घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधली. घराला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत चाेरट्याने ५० हजार रूपये रोख, १८ हजारांचे साडेचार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २४ हजार रूपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे झुंबळ असा एकूण ९२ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी रविवारी दुपारी १२ वाजता चोरीचा गुन्हा दाखल झाला.
देगाव गावातीलच नारायण भटा पाटील (वय ५८) यांनी रविवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, घराला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत चोरट्याने ७० हजार रूपये रोख, २० हजारांची सोन्याची अंगठी, २० हजार रुपयांच्या पानबाळ्या, १० हजारांचे सोन्याचे ओमपान, २० हजारांचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला.साक्री येथील घटना
साक्री येथील महावीर नगरात राहणारे नीलेश भास्कर पवार हे आपल्या परिवारासोबत बाहेरगावी गेलेले होते. ही संधी साधून चोरट्याने कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश करीत कपाटाचे लॉकर तोडले. त्यात ठेवलेले १५ हजार रूपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ५ हजाराचे सोन्याच्या कानातले, ४ हजार रूपये किमतीचे सोन्याचे पान, १ हजाराचे सोन्याचे पेंडल असा एकूण २५ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला. याप्रकरणी रविवारी दुपारी पावणे दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.