लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : पारंपरिक वाद्यांचा होणारा निनाद...गुलालाची चौफेर झालेली उधळण... त्यात भाविकांच्या मुखातून निघालेल्या ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ.. पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोषामुळे तयार झालेल्या मंगलमय वातावरणात शहरासह जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीला अर्थातच शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन पांझरा नदी व बिलाडी रोडवरील ‘हत्ती डोह’ परिसरात सुरू झाले. वाजत-गाजत भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेली दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र विसर्जनस्थळी दिसून आले. मानाचा खूनी गणपती सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास जुन्या धुळ्यातील खूनी मशिदीसमोर आल्यानंतर यावेळी मुस्लीम बांधवांनी मशिदीतून खूनी गणपतीच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. आठ ठिकाणी व्यवस्था पावसाने यंदा पाठ फिरविल्यामुळे पांझरा नदीचे पात्र कोरडठाक पडले होते. परिणामी, भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मनपा प्रशासनातर्फे शहरातील आठ ठिकाणी भाविकांना विसर्जन करता यावे, यासाठी व्यवस्था केली होती. अनेक भाविकांनी विसर्जनस्थळी ठेवलेल्या पाण्याच्या टाकींमधील पाण्याचा स्पर्श मूर्तींना करून मूर्ती मनपा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कर्मचाºयांकडे दिल्या. तसेच निर्माल्यही अस्ताव्यस्थ न फेकता घंटागाड्यांमध्ये टाकले.
धुळे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:46 AM
‘मोरया’ चा जयघोष : पारंपरिक वाद्यात निघाल्या मिरवणुका
ठळक मुद्देसकाळी सात वाजेपासून शहरात घरगुती गणेश विसर्जन व त्यानंतर छोट्या मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मानाचा गणपतीची व मोठ्या मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली.रात्री १२ वाजून ४५ मिनीटांपर्यंत मिरवणुका सुरू होत्या. सर्वात शेवटी अमर गणेश मंडळाचा गणपतींची विसर्जन झाले. त्यानंतर विसर्जन मिरवणुका संपल्या.