लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ओम क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. मनिष जाखेटे यांना चार लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेच्या देवपूर शाखा व्यवस्थापकासह अन्य एक अशा दोघांविरूद्ध मंगळवारी चाळीसगाव रोड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डॉ.जाखेटे (रा.अग्रवाल नगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार १९ मे ते ९ आॅगस्ट दरम्यान गफूर नगर, वडजाई रोड येथील इम्रान फकीर मोहम्मद बागवान (२८) याने महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेच्या व्यवस्थापकाच्या मदतीने डॉ.जाखेटे आणि डॉ.धनंजय नेवाडकर यांचे संयुक्त खाते असलेल्या महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेतून धनादेशावर खोट्या सह्या करून त्या खात्यातील चार लाख २५८ रूपये काढून घेतले. तत्पूर्वी बागवानने डॉ.जाखेटे यांच्या बनावट व खोट्या सह्या करून बॅँकेत चेक वटवण्यास टाकला. बॅँक व्यवस्थापकास संचालकांच्या सह्या माहीत असताना व धनादेशावरील सह्या जुळत नसतांनाही डॉ.जाखेटे यांच्या खात्यात जमा असलेली रक्कम काढून देण्यास मदत केली. त्यामुळे संगनमताने गुन्हा केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध भादंवि कलम ४०३, ४०६, ४०८, ४२०, ४६७, ४६८, १२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. आहेर करत आहेत.
धुळ्यात डॉक्टर जाखेटे यांना चार लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 7:38 PM
फसवणूक : बॅँक व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध गुन्हा
ठळक मुद्देबनावट सह्या करून धनादेशाद्वारे पैसे काढले बॅँक व्यवस्थापकाचा सहभाग दोघांविरूद्ध फसवणुकीची गुन्हा