शाळा सिद्धी उपक्रम : राज्यस्तरीय समितीकडून होणार मूल्यमापन
धुळे,दि.4- शाळा सिद्धी उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. स्वत: शाळांनी केलेल्या अंतर्गत स्वमूल्यमापनात जिल्ह्यातील 1988 शाळांपैकी 179 शाळाच ‘ए’ श्रेणी मिळविली आहे.
आता ‘ए’ श्रेणी प्राप्त शाळांचे राज्यस्तरीय समितीद्वारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय समितीच्या मूल्यमापनात जर शाळांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली तरच त्यांचा ‘शाळा सिद्धी प्रमाणपत्र’ देऊन राज्यस्तरवर गौरव करण्यात येणार आहे. ‘ए’ श्रेणी प्राप्त शाळांनी मूल्यमापनात 90 ते 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत.
‘ए’ श्रेणी प्राप्त शाळांची तालुकानिहाय स्थिती
राज्यस्तरावरून दिलेल्या मानांकनाप्रमाणे शाळांनी स्वत: केलेल्या स्वयंमूल्यमापनात धुळे तालुक्यातील 404 शाळांपैकी 36 शाळा ‘ए’ श्रेणीत आल्या आहेत. धुळे मनपा क्षेत्रातील 201 शाळांपैकी 12, साक्री तालुक्यातील 648 शाळांपैकी 21 शाळांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील 326 शाळांपैकी 39 व शिरपूर तालुक्यातील 409 शाळांपैकी 71 शाळांनी ‘ए’श्रेणी प्राप्त केली आहे. ‘ए’ श्रेणी प्राप्त केलेल्या शाळांना राज्यस्तरीय समितीच्या मूल्यांकनासाठी आता जोरदार तयारी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने शाळाही तयारीला लागल्या आहेत.
185 शाळांचा उपक्रमात सहभागच नाही
जिल्ह्यातील 185 शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमातच सहभाग घेतला नाही. या शाळांनी ‘शाळा सिद्धी’ उपक्रमात का सहभाग घेतला नाही? हे शिक्षण विभागालाही पडलेले कोडे आहे. काही शाळांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून पुढील काहीच प्रक्रिया केली नाही, तर काही शाळांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशनच केले नाही.
यामध्ये धुळे तालुक्यातील 17, धुळे मनपा क्षेत्रातील 33, साक्री तालुक्यातील 98, शिंदखेडा तालुक्यातील 32, तर शिरपूर तालुक्यातील 5 शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने या शाळांना वेळोवेळी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी संधी देऊनही त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला नाही.