धुळे : गायीसह वासराला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बाभुळवाडी (ता. धुळे) येथे घडली. पवन संभाजी पाटील (वय १६) असे तरूणाचे नाव आहे.
पवन संभाजी पाटील व त्याचा भाऊ विशाल संभाजी पाटील हे दोघे भाऊ गावाजवळील शेतात गायीला चरण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी गायीसह वासराला पाणी पाजण्यासाठी ते दोघे जवळच असलेल्या एका खदानीत गेले.पवन हा पाण्याजवळ उभा असतांना त्याचा पाय घसरल्याने, तो खदानितील पाण्यात पडला. खदान १५ ते २० फूट खोल असल्यामुळे व पवनला पोहता येत नसल्यामुळे तो खाली दगडामध्ये अडकला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
भावाला वाचविण्यासाठी विशालने आरडाओरड केली. मात्र खदानीजवळ कोणीच नसल्याने, डोळ्यादेखत त्याला भावाचा मृत्यू बघावा लागला. त्याने गावात संपर्क करून नातेवाईकांना घटनास्थळी बोलविले. खदानीत पाणी जास्त असल्याने, बरीच शोधाशोध करून तब्बल चार तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. पट्टीचे पोहणारे संतोष नाना ठाकरे, परशुराम जतन पवार, मोहन रमेश मोरे यांनी पवनचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी यावेळी मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक हेमंत राऊत, जयकुमार चौधरी, मुकेश मोरे, आदींनी भेट दिली.
चार-पाच वर्षांपूर्वी पवनचे पितृछत्र हरपले होते. घरात आई आणि आजोबा होते तीन भाऊ आहेत. त्यात पवन हा सर्वात लहान होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा ही दिली होती.मोठे भाऊ मालवाहतूक गाडी चालवून व अल्पशा शेती करून आपला उदारनिर्वाह करीत आहे. या घटनेमुळे पवन पाटील याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.