धुळे : वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी तब्बल साडेतीन वर्षांनंतर वृद्ध कलावंत निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीच्या अध्यक्षांसह दहा जणांची या समितीत निवड करण्यात आलेली आहे. समिती गठित करण्यात आल्याने, प्रलंबित असलेल्या ६९४ प्रस्तावांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी मानधन योजना राबविण्यात येते. यासाठी त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येतात. गेल्या साडेतीन वर्षांत ६९४ पेक्षा अधिक वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी प्रस्ताव जिल्हा परिषदेत दाखल केले आहेत. मात्र, प्रस्तावांची निवड करणारी समितीच नसल्याने दाखल प्रस्तावांवर कोणताच निर्णय झाला नाही. प्रस्तावांची छाननी करून पात्र ठरविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या सदस्यांची समिती गठित करावी लागते. मात्र, आघाडी सरकारच्या कालावधीत ही समिती गठित करण्यात आली नाही. त्यानंतर शिंदे-भाजप सरकारच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत देखील समिती गठित झाली नाही. यासाठी कलावंतांनी विविध माध्यमांतून केलेले आंदोलन, पाठपुराव्यानंतर आता समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष म्हणून पारिजात चव्हाण, तर उपाध्यक्ष म्हणून श्रावण वाणी, तर सदस्य म्हणून जगदीश देवपूरकर, चंद्रवंदन चौधरी, सुनंदा गोपाळ, पपिता जोशी, रवींद्र चौधरी, तसेच समाजकल्याण अधिकारी, सांस्कृतिक कार्य संचालनालयातील सहायक संचालक हे सदस्य आहेत. सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. दरम्यान, समिती गठित झाल्यानंतर प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.