धुळे : धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजूर करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि., नवी दिल्लीचे सदर कंपनीचे अकाउंटिंग व फायनान्स अधिकारी हरिश सत्यवली याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने केली. दरम्यान, कंपनीचे संचालक प्रदीप कटियार यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे सत्यवली याने पोलिसांना सांगितले.
इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि., नवी दिल्ली या कंपनीने नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून २८ सप्टेंबर २००५ रोजी बांधा, चालवा व हस्तांतरित करा या तत्त्वावर करारनामा केला आहे. सदर कंपनीने कोरल असोसिएटस (उदयपूर, राजस्थान) या कंपनीस २२ ऑगस्ट २०२२ रोजी नॅशनल हायवे क्र. ३ (मुंबई - आग्रा) यावर असलेला चांदवड (जि. नाशिक) येथील टोल प्लाझाचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचा करारनामा केला आहे. सदर कंपनीने तक्रारदार यांना २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुखत्यार पत्राव्दारे टोल प्लाझा, चांदवड, जि. नाशिकचे संपूर्ण व्यवस्थापन व त्या संबंधी कागदपत्रांचे अधिकार प्रदान केले आहेत.तक्रारदार यांनी कोअर असोसिएट्स कंपनीने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापनाबद्दलचे डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ चे रिॲम्बसमेंट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएट्सने धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२३ रोजी धुळे लळिंग इरकॉन सोमा टोल वेचे मुख्य कार्यालयात फायनान्स अधिकारी हरिश सत्यवली यांनी स्वत:साठी दोन लाख रुपये व इरकॉन संचालक प्रदीप कटियार यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दिली होती. दाखल तक्रारीची दखल घेऊन सापळा लावून हरिश सत्यवली याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.