आॅनलाईन लोकमतधुळे : नवीन बांधकाम केल्याची सुधारित घरपट्टी पावती देण्यासाठी घर मालकाकडून २ हजार ७०० रुपयाची लाच घेतांना महापालिका वसुली विभागाचे लिपीक जितेंद्र वसंत जोशी यांना रंगेहात पकडले. बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.शहरातील जुने धुळे भागात राहणारे तक्रारदार यांनी आपल्या पत्नीच्या नावाचे सुपडु आप्पा कॉलनीतील मातीचे घर पाडून तेथे आर.सी.सी.बांधकाम केले. त्या बांधकामाची सुधारित घरपट्टी पावती मिळवून दिल्या कामी तक्रारदारकडून महापालिकेचे वसुली विभागाचे लिपीक जितेंद्र वसंत जोशी (वय ४७ वर्ष) यांनी सुरुवातीला ३ हजार नंतर तडजोडीअंती २ हजार ८०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने यासंदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लिपीक जितेंद्र जोशी (वय ४७ वर्ष) यांना पंचासमक्ष २ हजार ७०० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण व हेकॉ. जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, भुषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, शरद काटके, संदीप कदम, भुषण शेटे, सुधीर मोरे यांनी केली.