लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर पोलिसांच्या शोध पथकाने चोरीला गेलेल्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत़ याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ हस्तगत केलेल्या दुचाकीची किंमत १० लाख ६० हजार इतकी आहे़ यासंदर्भात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी उपस्थित राहुन माहिती दिली़ शहरातील बसस्थानक, न्यायालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कचेरी, गरुड कॉम्प्लेक्स आदी ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेलेल्या होत्या़ दुचाकी चोरी करणारे चोरटे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत होते़ परंतु ते सराईत नसल्याने त्यांची ओळख पटत नव्हती़ शहर पोलिसांच्या शोध पथकाने पेट्रोलिंग व गुन्हेगारांवर वॉच ठेवून शोध घेतला असता दिनेश मधुकर वाघ (३०), सतिष आनंदा वाघ (३८) दोन्ही रा़ उभंड ता़ धुळे यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्या चौकशीतून आशिष राजेंद्र शर्मा (३६, रा़ नाशिक) आणि जितेंद्र दिगंबर मोहीते (३५, रा़ उभंड ता़ धुळे) यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याकडून ३४ दुचाकी मिळून आल्या़ त्याची किंमत १० लाख ६० हजार इतकी आहे़ ही कारवाई उपअधीक्षक सचिन हिरे आणि पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, प्रकाश पाटील, सतिष कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदिप पाटील, रवि गिरासे, राहुल पाटील, कमलेश सुर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड यांनी केली़
धुळे शहर पोलिसांनी पकडल्या ३४ चोरीच्या दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 1:06 PM