आॅनलाईन नेटवर्कधुळे - जिल्ह्यात अपवाद वगळता संततधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान साक्री तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा, बुराई नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शनिवारी सकाळपासून ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्या मुळे पिंपळनेर येथे पांझरा नदीस मोठा पूर आला आहे. हे पाणी आता अक्कलपाडा धरणात पोहचत असून ते भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान पांझरा नदीच्या पुरामुळे मलांजन, देगाव आदी गावांचा संपर्क तूर्तास तुटला आहे.जून महिन्यात झालेल्या पावसानंतर मात्र डोळे वटारले. त्यामुळे पेरण्या केलेले शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीने संकटात सापडले होते. मात्र पंधरवड्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले तसेच उर्वरीत पेरण्यांचे कामही आटोपले आहे. सध्या पिकांची जोमदार वाढ होत असून संततधार स्वरूपात तुरळक ते हलका पाऊस होत आहे.साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बुराई नदीला अनेक वर्षांनंतर मोठा पूर आला आहे. नालेही भरून वाहू लागले आहेत. पांझरा व बुराई या नद्यांना आलेले पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पिंपळनेर येथे रस्ते व पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने स्थानिक प्र्रशासनांनी नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पिंपळनेर शहरात पुरामुळे नदीलगत असलेल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याच पुरामुळे परिसरात मलांजन, देगाव, शेनपूर या गावांचा संपर्क तुटला आहे.
धुळे जिल्ह्यात पांझरा, बुराई नद्यांसह नाल्यांना मोठा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:32 PM