धुळे - साक्री तालुक्यातील घोडदे येथे कान नदीच्या पुरात अडकलेल्या सुभाष विरसिंग सोनवणे या व्यक्तीची आज सकाळी सुटका करण्यात प्रशासनाला यश आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने ही कामगिरी केली. मात्र याच पुरात वाहून गेलेल्या दोघांचा अद्याप शोध लागलेला नाही.शनिवारी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसेच कान नदीवरील काबऱ्याखडक प्रकल्प भरल्याने तो ‘ओव्हर फ्लो’ होऊन पूर आला आहे. त्या पुरात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गरताड, ता.साक्री येथील बाळू शाहिराम ठाकरे(२१) व पंडित उलुशा गावीत (२६) हे दोघे वाहून गेले. संध्याकाळी ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. तर घोडदे येथे याच पुरात नदीतील खडकावर झोपडी करून राहणारा सुभाष विरसिंग सोनवणे हा अडकला असल्याचे रविवारी संध्याकाळी लक्षात आले. स्थानिक प्रशासनाकडून त्यासाठी येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची मदत घेण्यात आली. या दलाच्या १३ सदस्यांनी अथक प्रयत्न करून सोनवणे यांना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुरातून सुखरूप बाहेर काढले, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले. दरम्यान पुरात वाहून गेलेल्या दोघा तरुणांचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. नदीला पूर कायम असून त्या मुळे अडचणी येत असल्याचे मात्र तरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
धुळे जिल्ह्यात पुरात अडकलेल्या व्यक्तीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:57 PM