- देवेंद्र पाठक धुळे - गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हात सफाई करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६३ हजारांची सोनपोत लांबविली. ही घटना साक्री बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी घडली. घटना लक्षात येताच वृद्ध महिलेने आरडाओरड केली पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. रात्री सव्वाआठ वाजता चोरीचा गुन्हा दाखल झाला. धुळे शहरातील जुने धुळे भागातील सुपडू आप्पा कॉलनीत राहणारी कमलाबाई आत्माराम माळी (वय ६५) या महिलेने साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. काही कामानिमित्त कमलाबाई माळी या साक्रीत आलेल्या होत्या, आपले काम आटोपून त्या मार्गस्थ झाल्या. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्या साक्री बसस्थानकात दाखल झाल्या पण, धुळ्याकडे जाण्यासाठी त्या वेळेस एकही बस ही स्थानकात उभी नव्हती, त्यामुळे त्या बसस्थानकातील शेडमध्ये थांबलेल्या होत्या. त्यावेळेस प्रवाशांची बऱ्यापैकी गर्दी होती.
गर्दीचा गैरफायदा चोरट्याने उचलला आणि कमलबाई यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरट्याने शिताफीने लांबविली. चोरीची ही घटना साेमवारी दुपारी पावणेचार ते सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. थोड्या वेळानंतर कमलाबाई यांना गळ्यात सोन्याची चैन दिसून आली नाही. तिने सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास साक्री पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल के. एस. शिंदे करीत आहेत.