धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळाली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिली. जागा काँग्रेसला मिळाली असली तरी उमेदवार कोण असणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवारी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी धुळ्यात आले असता त्यांनी वरील माहिती दिली.
धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा सुरुवातीपासून काँग्रेसकडेच आहे. मात्र राज्यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ही जागा कोणाला मिळते याकडे लक्ष लागून होते. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट केले. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघातून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही लागून आहे.