- रावसाहेब चव्हाणतऱ्हाडी (जि.धुळे)— वयोवृद्ध सासूचे निधन झाल्याचे दु:ख झाल्याने, जावायानेही बारा तासातच या जगाचा निरोप घेतल्याची घटना धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी या गावात घडली. सासू व जावयावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. द्वारकाबाई राघो भामरे (वय १०५) व राजाराम बंडू वाघ (वय ७५) असे मयत सासू-जावयाची नावे आहेत.
द्वारकाबाई भामरे यांना तीनही मुलीच होत्या. मुलगा नसल्याने, त्यांची मोठी मुलगी कोकीळाबाई राजाराम वाघ व जावाई राजाराम बंडू वाघ (रा. कासोदा, ता. एरंडोल) हे गेल्या पाच वर्षांपासून तऱ्हाडी येथे वास्तव्यास आले. मुलगी-जावईच द्वारकाबाईच्या पालन पोषणाची जबाबदारी सांभाळत होते.
२३ मेरोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास द्वारकाबाईचे वृद्धपकाळाने निधन झाले. सासूच्या निधनाचे दु:ख झाल्याने, अवघ्या बारा तासाच्या अंतरातच जावाई राजाराम वाघ यांनीही २३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जगाचा निरोप घेतला. २४ मे रोजी सकाळी १० वाजता सासू-जावायाची सोबतच अत्ययात्रा काढण्यात येऊन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.