धुळे: आर्थिक वर्ष संपण्यात आले आहे मात्र अद्याप महानगरपालिकेच्या ५२ कोटी रूपयांच्या मालमत्ता कराची वसूली बाकी आहे. महानगरपालिकेच्या वसुली विभागाने ७५ टक्के वसुलीचे लक्ष्य डोळ्यासमाेर ठेवले होते. पण आतापर्यंत केवळ ३३ कोटी रूपयांचीच वसुली झाली आहे.
२०२२ - २३ या आर्थिक वर्षात महानगरपालिका प्रशासनाला एकूण ८५ कोटी दोन लाख रूपये इतका कर प्राप्त होणे अपेक्षित होते. पण केवळ ३३ कोटी ५९ लाख रूपये आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. शास्ती माफी योजना जाहीर केल्यानंतर वसुली वाढली आहे पण ५२ कोटी रूपये वसूल करण्याचे महानगरपालिकेसमोर आव्हान आहे. दरम्यान, शास्ती माफीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांची शंभर टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर वसुली विभागाकडून करण्यात आले आहे.
कारवाईच्या इशाऱ्यानंतरही प्रतिसाद नाही मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. जप्ती मोहीम राबवली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या तीनशे मालमत्ताधारकांची नावे वर्तमान पत्रात प्रकाशित करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही वसुली संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
१८ मोबाईल टॉवर केले सील शहरात टॉवर उभारलेल्या मोबाईल कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात मालमत्ता कर थकवला आहे. त्यांच्यावर वसुली पथकाकडून धडक कारवाई केली जात आहेे. आतापर्यंत शहरातील १८ मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहेत. तसेच मालमत्ता कर थकविणाऱ्या गाळेधारकांचे गाळे सील करत त्यांना दणका देण्यात आला आहे. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी न भरणाऱ्या एका राष्ट्रीय बँकेच्या शहरातील शाखेला टाळे ठोकत मोठी कारवाई करण्यात आली होती. ३१ मार्चपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांवर जप्तीची कारवाई करणार आहोत. - मधुकर निकुंभे, अधिक्षक मालमत्ता कर वसुली विभाग