लोकमत आॅनलाईन धुळे : येथील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी सुमारे ३२ टक्के मतदान झाले होते. सकाळी शुकशुकाट जाणवणाºया बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढत असल्याचे दिसून आले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. मात्र या वेळी धनलक्ष्मीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. जोपर्यंत पैसे मिळत नाही, तोपर्यंत मतदार घराबाहेर पडण्यास नाखूश दिसत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना मतदानासाठी घराबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसले. मतदान केंद्रांच्या पसिरात पोहचल्यानंतरही मतदार मतदान करण्यास ते अनुत्सूक दिसत आहेत. याच्या उलट चित्र देवपूर परिसरातील महाजन हायस्कूल, एल.एम. सरदार उर्दू हायस्कूल, मोहाडी उपनगर आदी केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. त्यातही महिलांचा संख्या लक्षणीय असल्याचे दिसले. संवेदनशील केंद्रांवर दुपारनंतर मोठ्या रांगा लागतील, असा कयास बांधून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दुपारनंतर बहुतांश केंद्रांवर रांगा लागल्याने उशीरापर्यंत मतदान सुरू राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांना नाखूश मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रांत आणण्यात यश मिळाल्याने केंद्रांच्या आवारात रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून त्यानंतरही मतदान सुरूच राहील, असा अंदाज आहे. मुस्लिमबहुत भागातील केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र दुपारनंतरही कायम होते.