लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील महापालिकेच्या कायम विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता न मिळाल्याने इंग्रजी माध्यमाच्या चार शाळा यंदाच्या वर्षापासून बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मनपा शिक्षण मंडळामार्फत मनपा शाळा क्रमांक ३, ९, १४ व २५ या इंग्रजी माध्यमाच्या चार शाळा जून २०१३ पासून कायम विना अनुदानित तत्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये ज्युनियर व सिनियर केजी, पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. संबंधित शाळांसाठी पदनिर्मिती करणे आवश्यक असून पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना १७ जानेवारीला पाठविण्यात आला होता़ मात्र त्या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित शाळा सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. इंग्रजी शाळांमध्ये शिकणा-या ज्युनियर केजी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परिसरातील अन्य शाळांमध्ये व्यवस्था करावी व सर्व विद्यार्थ्यांचे दाखले अद्ययावत करून ते विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावेत, असे पत्र शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी चारही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहे.
धुळे महापालिकेच्या चार इंग्रजी शाळा होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:54 PM
आयुक्तांचे आदेश, मुख्याध्यापकांना दिले पत्र
ठळक मुद्दे- महापालिकेच्या चार शाळा बंद करण्याचे आदेश- विद्यार्थ्यांची अन्य शाळांमध्ये व्यवस्था करणार- प्रशासन अधिका-याचे मुख्याध्यापकांना पत्र