लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या उपशिक्षकाचे थकीत मानधन देण्यासाठी १५ हजाराची लाच घेतांना महापालिका उपायुक्त रविंद्र जाधव आणि शिक्षण मंडळातील लिपीक आनंद जाधव यांना सोमवारी रात्री साडे आठ वाजता पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. महापालिकेच्या शिक्षण मंडळात कार्यरत असलेले उपशिक्षक यांचे गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन थकलेले आहे़ ते मिळण्यासाठी त्यांचा शिक्षण मंडळाकडे पाठपुराव सुरु होता़ वेतन मंजुरीला मान्यता देण्यासाठी उपायुक्त रवींद्र जाधव यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयातील लिपीक आनंद बापुराव जाधव याच्या मार्फत १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती़ तक्रारदार उपशिक्षकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानुसार उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी सापळा लावला़ सोमवारी रात्री अग्नीशमन दलाच्या इमारतीच्यावर राहणारे उपायुक्त रविंद्र जाधव यांच्या घरी त्यांना लिपीकासह लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे आणि पथकाने केली़
धुळे महापालिका उपायुक्तासह लिपीक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:23 PM