धुळे : शिंदखेडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी भावराव हिलाल भिल (वय ३१ ) यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. हा निकाल धुळ्याचे विशेष न्यायमूर्ती यास्मीन देशमुख यांनी दिला.
आरोपी भावराव भिल याने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अंमलदार पीएसआय प्रकाश पोतदार, राजेंद्र माळी यांनी तपास करून आरोपी विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
विशेष सरकारी वकील अजय शंकरराव सानप यांनी पीडितेसह डॅाक्टर, तिचे वडील आदींची साक्ष न्यायालयात नोंदविली. ॲड. सानप यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयाने विविध कलमान्वये आरोपी भावराव भिल यास सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १८ हजार रुपयांचा दंड ठोठवला. ॲड. सानप यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले.