ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 30 - विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी धुळे जिल्ह्यातील नर्सेस अर्थात परिचारीकांनी मुंबई गाठली़ आंदोलनही केल़े पण, पावसामुळे त्या अडकल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला़ असे असतानाच एकीने 100 हा क्रमांक फिरविला आणि पोलिसांची मदत घेतली़ अवघ्या काही क्षणार्धात पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली़ पोलिसांमुळे धुळ्याच्या नर्सेस सुखरुप आहेत़ अशी माहिती पुजा थोरात या नर्सने दुरध्वनीवरुन ‘लोकमत’शी बोलताना दिली़ धुळे जिल्ह्यातील राज्यातील नर्सेसने (परिचारीका) आपल्याला सेवेत नियमित करावे यासह अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझादमैदान येथे 28 आणि 29 ऑगस्टला आंदोलन केल़े विशेष म्हणजे हे आंदोलन पावसातच सुरु होत़े पावसाचा वेग वाढला़ परिणामी आंदोलन करणा:या सुमारे 500 नर्सेस त्याठिकाणी अडकल्या़ त्यात धुळ्याच्या पुजा थोरात, वर्षा शिरसाठ, नीता भालेराव, शितल थोरात, माधुरी परदेशी, सविता निकम, विजया क्षिरसागर, भावना सोनावणे, प्रीती कोळी, आम्रपाली बागुल, जयश्री पाटील यांचा समावेश होता़ थोडी हुशारी आणि समयसुचकता बाळगत त्यातील एकीने मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ त्यासाठी 100 यावर संपर्क साधून आपबीती व्यक्त केली़ वेळ न घालविता मुंबई पोलिसांनी क्षणार्धात त्या नर्सेसने सांगितलेले घटनास्थळ गाठल़े सर्वाना सुखरुपपणे मुंबईतील सीएसटी येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आणल़े सध्या त्या पोलिसांमुळे सुखरुप असून लवकरच पावसाचा जोर आणि तुंबलेले पाणी कमी झाल्यानंतर धुळ्याकडे रवाना होणार असल्याचे पूजा थोरात या नर्सने दूरध्वनीवरुन सांगितल़े