धुळे : कोरोनाच्या अनुषंगाने सर्वच नागरीकांना घरात राहण्याचा सल्ला देणारे पोलीस मात्र रस्त्यावर उभे राहून जीव धोक्यात टाकून आपली सेवा बजावित आहेत़ अशा कठीण प्रसंगी त्यांच्या मनाचे संतुलन राहण्यासाठी मानसोपचार तज्ञाकडून त्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम सुरु झालेला आहे़ या उपक्रमाचे आता पोलीस वर्तुळातून कौतूक होण्यास सुरुवात झाली आहे़कोरोना या विषाणूपासून होणारा धोका वाढू नये यासाठी देशपातळीवरुन सुरुवातीला एक दिवसाचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यावेळी नागरीकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन करत या लॉकडाउनमध्ये सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या़ यावेळी देखील पोलीस रस्त्यावरच होते़ त्यानंतर लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ सर्वांनाच घरी राहण्याचा सल्ला देत असताना सर्वच व्यवहार बंद करण्यात आले़ यावेळी अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत ठेवण्यात आल्या़ कोणत्याही प्रकारचा गोंधळ उडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला़नागरीकांसाठी पोलीस रस्त्यावर आहेत़ त्यांच्या परिवारापासून दूर आहेत़ एवढेच नव्हेतर आता जालना येथून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील धुळे जिल्हा पोलिसांच्या दिमतीला उभी आहेत़ या अनुषंगाने पोलिसांच्याही मनाचा विचार पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी करण्यास सुरुवात केली़शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना रोखणे प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजाविण्यासााठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे़ या जागेवर जावून त्यांचे समुपदेशन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ यासाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्यासोबत मानसोपचार तज्ञ डॉ़ तुषार भट पोलिसांच्या बंदोबस्ताच्या ठिकाणी जावून पोलिसांशी संपर्क साधत आहेत़ त्यांच्याशी बोलून त्यांच्या मनातील भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत़ त्यानंतर त्यांच्याशी होणारा संवाद आणि त्यातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली जात आहेत़ ज्या महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना काही अडचणी आहेत, मनातील काही घालमेल आहेत हे लक्षात घेऊन त्याचठिकाणी त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून दिले जात आहेत़ अशा प्रकारचा उपक्रम यापुर्वी झालेला नसल्याने त्याला प्रतिसाद मिळत आहे़कोरोनामुळे सर्वच ठप्प, चिंतेचे वातावरणकोरोनामुळे चिंता वाढली आहे़ ही चिंता दूर करत काय करता येईल यासाठी सुरुवातीला विचार विनियम करण्यात आला होता़ त्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेण्याचा विचार पुढे आला होता़नागरीकांसाठी देखील एक पाऊलसंपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले़ सुरुवातीला एक दिवस केल्यानंतर आता १४ एप्रिलपर्यंत ते सुरुच राहणार आहे़ या कालावधीत सर्वच नागरीकांना घरीच थांबण्याचे सांगितल्यामुळे अनेक जणांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे़ त्यांच्या मनाची घालमेल होत असल्यामुळे त्यांच्या मनातील भाव जाणून घेत समुपदेशन करण्यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी डॉक्टरांशी संपर्क केला होता़ ज्या नागरीकांना समुपदेशाची आवश्यकता आहे, अशा नागरीकांनी मानसोपचार तज्ञांशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले होते़ त्यालाही प्रतिसाद मिळाला़
धुळे पोलिसांचे जागेवरच होतेय ‘समुपदेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 8:55 PM