- अतुल जोशी
धुळे : लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. शहरातील एका मंगल कार्यालयात मंगलाष्टके सुरू असताना वधू-वराच्या अंगावर अक्षता टाकण्यात व्यस्त असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेची दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ मे रोजी घडली. या पर्समध्ये तब्बल तीन लाखांचे दागिने होते. याप्रकरणी आझादनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा येथील रहिवासी संध्या जयवंतराव बोरसे (वय ५६, रा. प्रोफ्रेसर कॅालनी, पंचायत समितीजवळ, शिंदखेडा) या शहरातील नालंदा हॅाटेलच्या मागे असलेल्या रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या अंगावरील दागिने, रोख रक्कम, पर्समध्ये ठेवून ती पर्स स्वत:जवळ जमिनीवर ठेवली. मंगलाष्टके सुरू असताना संध्या बारसे या वधू-वराच्या अंगावर अक्षता टाकत असल्याची संधी साधत चोरट्याने दागिन्यांची पर्स लांबविली. पर्समध्ये दागिने, रोख रक्कम असा २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आझादनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई एम.एम. नवगिरे करीत आहेत.