- देवेंद्र पाठक धुळे - जिल्ह्याभरात मोटारसायकल चोरट्यांनी हैदोस घातलेला आहे. मात्र खास करून रेंजर सायकल चोरीला जाण्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने रेंजर सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास गजाआड करण्यात यश मिळविले. वसीम अजीज शेख (वय २०) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. एकवीरा देवी मंदिर परिसरात सायकल चोरटा आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच सापळा लावून एकाला पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सायकली चोरल्याची कबुली दिली. वसीम अजीज शेख (वय २०, रा. पांचाळ वाडा, नदीकिनारी, देवपूर, धुळे) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. वसीम याने लपविलेल्या सायकली पोलिसांना काढून दिल्या. एलसीबीने ४२ हजार रुपये किमतीच्या ७ रेंजर सायकली जप्त केल्या आहेत. याशिवाय देचपूर पोलिसात दाखल गुन्ह्यची उकल करण्यात आली आहे. वसीम शेख हा अट्टल चोरटा असून त्याच्यावर देवपूर आणि पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्याम निकम, कर्मचारी अशोक पाटील, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी, योगेश साळवे, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन यांनी कारवाई केली.