- अतुल जोशी
धुळे - शहरानजीक असलेल्या अवधान एमआयडीसी परिसरातून तब्बल ६३ हजार रुपये किमतीचे सोयाबीन चोरून नेणाऱ्या सहा जणांना मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सोयाबीनच्या कट्ट्यांसह एक रिक्षा व एक दुचाकी असा एकूण १ लाख ३१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अवधान एमआयडीतून ७ मे २३ रोजी ६३ हजार रुपये किमतीचे २३ कट्टे सोयाबीनची चोरी झालेली होती. याप्रकरणी जयदुर्गा इंडस्ट्रीजचे रवींद्र विलास येडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आलेले होते. या गुन्ह्यातील आरोपींचा व चोरी झालेल्या मालाचा तपास सुरू असताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे हा गुन्हा रवी यशवंत मालचे (वय ३०), करण शांताराम सोनवणे (वय १९), नवनाथ महादू सोनवणे (वय ३५, सर्व रा. दिवाणमळा), सोमनाथ राजू सोनवणे (वय ३०), आकाश सुकदेव ठाकरे (वय २०, रा. लळिंग) व दगा रामदास पवार (भील (वय २६, रा. जुन्नेर, ता. धुळे) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (क्र. एमएच १८ बीएच ०८६९) व दुचाकी (क्र. एमएच १८ सीए ७२३६) तसेच सोयाबीनचे कट्टे असा एकूण १ लाख ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.