- सचिन देव धुळे - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाने दोन दिवसांपूर्वी रूपया निधी वर्गणीमध्ये वाढ करून, ती दोन हजार रूपयांपर्यंत केली होती. या निर्णयाला राज्यभरातील एसटी बॅंकेच्या सभासदांनी विरोध दर्शविला होता. तसेच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रकाराबाबत राज्याच्या सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे एसटी बॅंकेने रूपया निधी वर्गणीतील दर महा दोन हजार रूपये कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत २८ रोजी सायंकाळी पत्र काढून, सभासदांना कळविले आहे. यामुळे राज्यभरातील एसटीच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
एसटी बॅंकेच्या सभासद असलेल्या सभासदांकडुन मासिक वेतनातुन एक विशिष्ट रक्कम कपात करून ती `रूपया निधी ठेव ` योजनेमध्ये जमा केली जाते. या या संचित रक्कमेवर सभासदास वार्षिक त्तत्वावर व्याज दिली जाते. सध्या वेतनाच्या टप्प्यानुसार सदर रक्कम किमान १०० ते ५०० ऐवढी आहे. मात्र, ॲड. गुणरत्न सदावर्तेच्या निवडून आलेल्या संचालक मंडळाने २८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या झालेल्या बैठकीत रूपया निधी वर्गणी किमान २ हजार रूपये करण्याचा ठराव केला होता. या निर्णयामुळे बॅंकेेचे अनेक सभासद थकबाकीमध्ये जाणार होते. तसेच वेतनातील कपातीमुळे कर्मचारी आर्थिक अडचणी येणार होते. त्यामुळे राज्यभरातील बॅंकेचे सभासद असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी या निर्णयाल विरोध करून, सभासदांना विश्वासात न घेतल्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे बॅंकेच्या संचालक मंडळाने लागलीच शुक्रवारी सायंकाळी रूपया निधी वर्गणी वाढीचा निर्णय मागे घेत असल्याचे पत्र काढले आहे. दरम्यान, याबाबत `लोकमत ` प्रतिनिधीने बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील, तसेच बॅंकेचे संचालक संतोष राठोड यांच्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
दोन हजार रूपये निधी वसुल करण्याचा संचालक मंडळाचा हा निर्णय बेकायदेशिर व सभासदांवर अन्यायकारक होता. या निर्णयामुळे बहुतांश सभासद थकबाकीदार झाले असते. या बाबत राज्याच्या सहकार आयुक्तांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी दखल घेतल्याने हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. मात्र, नवीन संचालक मंडळाने बेकायदेशिर निर्णय घेण्याचा धडाका लावल्याने, सभासदांमध्ये नाराजी आहे.- संदीप शिंदे अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.