ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 28 - शहरातील बारावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी उन्नती महाले (17) हीने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी गिरीष साळुंखे व नरेंद्र महाले या दोघ खाजगी क्लासेस चालकांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 10.30 शहरातील प्रमोदनगर सेक्टर 2 मध्ये उन्नतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिची मैत्रीण रूमवर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र संध्याकाळी चर्मकार समाज पदाधिकारी व उन्नतीचे वडील वसंत महाले यांनी पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी क्लासेस चालकाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्या त्रासाला कंटाळून उन्नतीने आत्महत्या केल्याची तक्रार त्यांनी केली. तर कोचिंग क्लासमध्ये लावलेला नीट परीक्षेचा क्लास उन्नतीने बंद केला. त्याचा राग मनात धरून क्लासचालक गिरीष साळुंखे व नरेंद्र महाले यांनी वेळोवेळी क्लासमध्ये सर्वासमोर उन्नतीस अपमानित करून मानसिक त्रास दिला, अशी फिर्याद वसंत महाले यांनी दिली. त्यानुसार रात्री उशीरा दोघा क्लास चालकाविरूद्ध गुरनं136/2017 भादंवि कलम 306 सह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड तपास करीत आहेत.