धुळे : राज्याच्या गृहविभागाने पोलीस अधीक्षक दर्जाच्या भापोसे व रापोसे अधिकाऱ्यांची बदली व पदस्थापनेबाबतचे आदेश गुरुवारी (दि. २०) काढले. नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांचीही पदोन्नतीने धुळे अधीक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आहे.
भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील अधीक्षक दर्जाच्या २४ अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीने नव्याने पदस्थापनाही करण्यात आली आहे. बदली आदेशात अन्य १९ पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली केल्याचे दर्शविण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या बदलीनुसार नव्याने पदस्थापनेचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाही. त्यात धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांचा समावेश आहे.
नाशिकचे उपायुक्त संजय बारकुंड यांची धुळ्यात पोलीस अधीक्षक या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री यांचा दौरा नाशिकला असल्यामुळे दोन ते तीन दिवसात पदभार घेईल. जिल्हा समजून घेतल्यानंतर सविस्तर बोलू असे नूतन पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी लाेकमतला सांगितले.