आॅनलाइन लोकमतधुळे : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू विक्रेते, त्याचबरोबर बनावट मद्य बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. त्यात १३४ संशयितांवर गुन्हे दाखल करून ५३ जणांना अटक केली. या कारवाईच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धुळे प्रभारी अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.धुळे जिल्हा हा मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने या भागातून अवैध दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. निवडणूकीच्या काळात हे प्रमाण जास्त असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली होती.जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारूसह गुळमिश्रीत दारू,बनवाट मद्य असे विविध प्रकारचे अवैधधंदे जोरात सुरू आहेत. यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत धडक करवाईचे सत्र राबवून जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई केल्या आहेत.पथकाने हाडाखेड चेक पोस्ट नाका, शिरपूर, सांगवी, धुळे शहर अशा ठिकाणी भरारी पथकाने वारस-बेवारस अवैध देशी-विदेशी मद्यसाठा,गुळमिश्रीत दारू, गावठी दारू, ताडी, स्पिरीट आदी कारखान्यांवर कारवाई केली.यात पथकाने गेल्या महिनाभरात ३२ हजार गावठी दारू,५७५ लिटर स्पिरीट, एक हजार लिटर बनावट मद्यसाठासह १३४ संशयितांवर मुंबई प्रोव्हीशन अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी ५३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तीन वाहनेही जप्त केली. या कारवाईतून उत्पादन शुल्क विभागाने े१७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे.
धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिन्याभरात १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:45 AM