ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.8 - पंचायत राज समिती सदस्य तथा नांदेड येथील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना दीड लाखाची लाच देताना धुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना शुक्रवारी सायंकाळी धुळे शहरातील एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. कापडणे येथील शाळेत शालेय पोषण आहारात आढळलेल्या त्रुटी विधिमंडळात मांडू नये, साक्ष घेऊ नये यासाठी या अधिका:याने नेमका आपल्या वाढदिवशीच हा प्रताप केला. योगायोगाने हेमंत पाटील हे मूळचे कापडणे येथीलच रहिवासी आहेत.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या अधिका:याला अटक करण्यात आली. धुळे जिल्ह्यात पंचायत राज समितीच्या पथकाने तपासणी केल्यानंतर या अधिका:याकडून वारंवार भेटीच्या विनंतीमुळे आमदार पाटील यांना याबाबत संशय आला. शुक्रवारी पंचायत राज समितीचा दौरा संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परत जाताना आमदारांनी माळी यांना भेटण्यास मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलात बोलविले. तेथे माळी यांनी आमदार पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रय} केला. तेव्हा लाचलुचपत विभागाच्या पथकाने माळी यांना रंगेहाथ पकडले.
पोषण आहारात ‘घोळ’
समितीचे सदस्य नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी अन्य काही सदस्यांसह कापडणे येथे पाहणी केली़ समितीने जि.प. शाळेला भेट दिली असता पोषण आहाराची गोणी 50 किलोऐवजी 13 किलो आढळली़ प्रत्यक्षात वस्तूंची खरेदी न करता कागदावरच खरेदी दाखविण्यात आल्याचेही आढळून आले. या प्रकरणाची वाच्यता कुठे करू नये आणि विधिमंडळात हा विषय मांडू नये यासाठी आमदार हेमंत पाटील यांच्याकडे गुरुवारपासून जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी हे भेटण्यासाठी वेळ मागत होते.