धुळे : ‘शिरपुरात झोपडीतील शाळाही डिजिटल’ या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची (1 फेब्रुवारी) खुद्द राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दखल घेतली आहे. राज्यपाल कार्यालयाने ही बातमी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी धुळे जिल्हा परिषदेला फोन करून ‘शाळा डिजिटल झाली तरीही ती झोपडीत का?’ अशी विचारणा केली आणि या शाळांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली. या सूचनेनुसार आता लवकरच वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जि.प. शिक्षण विभागाची बैठक होणार आहे. ‘डिजिटल शाळा’ या वृत्तमालिकेचा हा तिसरा भाग प्रसिद्ध झाला त्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी राज्यपाल कार्यालयाकडून धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना या शाळांना बांधकामासाठी काय अडचणी आहेत, याबाबत विचारणा करण्यात आली. तसेच याबाबत तत्काळ बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. या शाळांच्या इमारतीची समस्या सोडविण्यासाठी वनविभाग, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून संयुक्त प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खुद्द राज्यपाल पातळीवरून हा विषय गंभीरतेने घेतल्यामुळे आदिवासी पाडय़ावरील गरीब मुलांनाही शिक्षणासाठी चांगल्या इमारतीमध्ये शाळा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
डिजिटल शाळा, तरीही झोपडीत का?
By admin | Published: February 10, 2017 11:21 PM