शिरपूर : वरवाडे गावातील तेजस्विनी निवास येथे गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकून तळघरात चालणारा बनावट दारू कारखाना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून 4 लाख 51 हजार 881 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी घरमालक नारायण पगारे यास अटक करण्यात आली आहे.वरवाडे गावात बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. या वेळी तेथून पळ काढताना घरमालक नारायण अशोक पगारे (माळी) (वय 39) यास पकडण्यात आले. घरातील बेडरूमच्या भिंतीलगत 2 बाय 2 चा खोल खड्डा करण्यात आला होता. तेथून खाली तळघरात हा कारखाना चालविला जात होता. या ठिकाणी लोखंडी मशीन, देशी व विदेशी दारूच्या भरलेल्या व रिकाम्या काचेच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, बाटली बूच व एका 200 लीटरच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये 35 लीटर स्पिरीट, मोबाइल, बॅटरी असा एकूण 4 लाख 51 हजार 881 रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संशयित नारायण पगारे याच्याविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 120(ब), 328, 420, 485, 486, 487, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), (ब), (क) (ड) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांचे पथक पाहून घरमालक नारायण पगारे हा तेथून पळत होता. पथकाच्या कर्मचा:यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
शिरपूरला बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त
By admin | Published: April 28, 2017 12:55 AM