धुळे : दोंडाईचा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समधील श्रीनाथ फर्टिलायझर येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकून तेथून ३६ हजार ८१६ रुपये किंमतीचे कापसाचे बोगस बियाणे कृषी विभागाच्या पथकाने पकडले़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़दोंडाईचा शहरातील स्टेशन भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉम्पलेक्समध्ये कमलेश कुंभार यांचे श्रीनाथ फर्टिलायझर नावाचे बी-बियाणे विक्रीचे दुकान आहे़ दुकानात कपाशीचे बोगस बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाचे विस्तार अधिकारी योगेश पद्मसिंग गिरासे यांना मिळाली़ त्यानुसार, कृषी विकास अधिकारी पी़ एम़ सोनवणे, मोहिम अधिकारी अभय कोर, साक्रीचे कृषी अधिकारी रमेश नेतनराव यांच्या पथकाने श्रीनाथ फर्टिलायझर या दुकानावर मंगळवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकला़ दुकानाचे मालक कमलेश कुंभार यांच्या समक्ष तपासणी केली असता त्यात ३६ हजार ८१६ रुपये किंमतीचे कापसाचे बी-बियाणे आढळून आले़ बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आाहे़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात बियाण्यांचे उत्पादक कंपनी, कंपनीचे मालक , शैलेश वाणी (रा़ नंदुरबार) आणि श्रीनाथ फर्टिलायझरचे मालक कमलेश कुंभार या चार जणांविरुध्द विस्तार अधिकारी योगेश गिरासे यांच्या फिर्यादीवरुन सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला़
दोंडाईचा येथून ३६ हजाराचे बोगस बियाणे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 9:52 PM