पिंपळनेर,दि.4- साक्री तालुक्यातील काकरपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी भागात अवैध दारूचा धंदा तेजीत सुरू आहे. या भागात होणारी बोगस दारू विक्रीमुळे आदिवासी कुटुंबाचे जीवन व संसार उध्वस्त होत आहेत. तत्काळ, या भागात दारू बंदी लागू करावी, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी नायब तहसीलदार वाय. सी. सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काकरपाडा ग्रुप ग्रामपंचायतीत राईनपाडा, हनुमंतपाडा, गोटाळ-आंबा, खटकीपाडा, खालचे, वरचापाडा, निळी घोटी, नवी आळी, काकर्दे आदी आदिवासी पाडे येतात. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे याठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असून आता तरी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अवैध व्यवसाय करणा:यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कडक कारवाईची अपेक्षा
आदिवासी भागात बहुतांश कुटुंबातील सदस्य हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, अनेकांना येथे सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांमुळे अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. परिणामी, अनेक कुटुंबातील सदस्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
अवैध दारू विक्री बरोबरच या भागात जुगाराचे डाव मोठय़ा प्रमाणावर खेळले जातात. त्यात येथील तरुणाईही शिक्षणाकडे दुर्लक्ष करून जुगार खेळू लागली आहे. यावेळी सखाराम पवार, पंचायत समिती सदस्य विश्वास बागुल, दौलत बागुल, बन्सीलाल भोये, जामा चौरे, शांताराम चौधरी, केटय़ा बागुल, तुकाराम पवार, रमेश सोनवणे, बापू चौधरी, जगन गवळी, साईराम भोये व ग्रामस्थ उपस्थित होते.