धुळे : दुपारच्यावेळी महामार्गावरुन जाणारे वाहन अडवून चालकाला मारहाण करीत वाहनाचे नुकसान केल्याची घटना चिमठाणे चौफुलीनजिक २२ मार्च रोजी घडली होती़ याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात महिन्याभरानंतर ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असून वाहतूक ठप्प झाली आहे़ अशावेळी २२ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ते सोनगीर रोडवरील चिमठाणे चौफुलीवर वाहन जात होते़ हे वाहन जात असल्याचे पाहून गावातील ११ जणांच्या टोळक्याने हे वाहन अडविले़ चालकाला मारहाण करीत वाहनाच्या पुढील काच आणि साईड ग्लास फोडून नुकसान केले़या घटनेनंतर वाहनचालक निघून गेला असता संचारबंदीच्या काळात जमाव केला म्हणून हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सोनवणे यांनी या टोळक्याविरुध्द पोलिसात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, योगेश जयसिंग गिरासे, अतुल जयसिंग गिरासे, राहुल बाबुराव पाटील, बंटी उर्फ दिग्विजय सनी गिरासे, समाधान भिलेसिंग गिरासे, मोनू राजेंद्र गिरासे, धनसिंग आनंदसिंग गिरासे, गितेश चंद्रसिंग गिरासे, विजय तुकाराम माळी, मोनू रविंद्र पाटील आणि सनी धनगर (सर्व रा़ चिमठाणे) यांच्या विरोधात २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता फिर्याद दाखल झाली़ भादंवि कलम १४३, १४७, २३२, ४२७, ३४१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ सपोनि मनोज ठाकरे तपास करीत आहेत़
वाहन अडवून केली चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:26 PM