धुळे : कोरोनामुळे वाहनचालक आणि मालकांचे उत्पन्न घटले आहे. याउलट खर्च मात्र वाढला आहे. त्यामुळे भागवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
सर्वाधिक नुकसान खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक आणि रिक्षाचालकांचे होत आहे. कोरोनामुळे नागरिक बाहेर पडत नाहीत. बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या निम्म्यापेक्षा खाली आली आहे. त्याच प्रमाणात उत्पन्नदेखील घटले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. थोडीफार कमाई होते म्हणून वाहन रोज रस्त्यावर काढावे लागते. घसारा होतो, दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो. उत्पन्न घटले असले तरी खर्च मात्र वाढला आहे.
तसेच शेकडो वाहनचालक मोठे अधिकारी आणि श्रीमंत लोकांच्या खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. कोरोनामुळे हे सर्वजण घरातच असल्याने त्यांच्या गाड्यादेखील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये किंवा बंगल्यात पार्क करून पडल्या आहेत. वाहनचालकांचा रोजगार बंद झाल्यासारखा आहे. काही मालक आपल्या वाहनचालकांना तरीही मदत करताना दिसत आहेत. असे असले तरी काम बंद झाल्याने अडचणी येत आहेत.
बदली चालक म्हणून काम करणाऱ्या वाहनचालकांची परिस्थिती देखील वाईट आहे. घर कसे चालवावे असा प्रश्न वाहनचालक आणि मालकांपुढे आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन झाले. कोरोनामुळे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. दिवाळीनंतर काहीशी सुधारणा झाली. चांगले दिवस येत असतानाच पुन्हा यंदाच्या मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आणि निर्बंध आले. त्यामुळे अनेक वाहनचालक आणि मालकांनी गाड्या, रिक्षा घरी लावून वेगळा व्यवसाय, वेगळे काम सुरू करून उदरनिर्वाह भागविण्याला प्राधान्य दिले आहे.
वाहन सुरू, पण गॅरेज बंद
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले असले तरी अत्यावश्यक सेवा म्हणून जवळपास सर्वच वाहनांची रस्त्यांवर वर्दळ आहे. सर्वच वाहने सुरू आहेत. माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने महामार्गांवर ट्रकची संख्या मोठी आहे. वाहने सुरू असली तरी गॅरेज मात्र बंद आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून महामार्गांवर तसेच शहरात दिलेल्या वेळेत गॅरेज सुरू असल्याचे चित्र आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
कोरोनामुळे वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर आहे. खासगी वाहनांच्या बाबतीत फारसी अडचण नाही. कारण कुटुंबांना घरातच राहण्याचा सल्ला आहे; परंतु खासगी प्रवासी वाहनांवरील चालकांचे मात्र हाल आहेत. त्यांची वाहने सुरू असली तरी प्रवासी संख्या घटली आहे. दुरुस्तीसाठी गॅरेज नाही आणि पैशांचीही अडचण आहे.
वाहने पार्किंगमध्येच
कठोर निर्बंधांमध्ये शासनाने परवानगी दिल्यानंतर वाहन चालविले; परंतु प्रवासी बाहेर पडत नसल्याने उत्पन्न मिळाले नाही. खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे वाहन घरीच पार्क करून ठेवले आहे.
- संतोष वाडिले, वाहनचालक
कोरोनामुळे कुणीही बाहेरगावी जात नाही. प्रत्येकजण जीव सांभाळून घरात बसले आहेत. वाहनेदेखील पार्किंगमध्ये लावली आहेत. त्यामुळे काम बंद पडले आहे.
- राहुल पाटील, वाहनचालक
गॅरेजवाल्यांचे पोटपाणी बंद
सुरुवातीचे १५ दिवस गॅरेज बंदच होते. नंतर सकाळी परवानगी मिळाली. आता सुरू केले आहे; परंतु कोरोनामुळे अनेकांची वाहने घरीच पडून असल्याने फारसे ग्राहक येत नाहीत. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती कधी सुधारेल याची प्रतीक्षा आहे. कारागिरांचे देखील हाल होत आहेत.
- सादिक शेख, गॅरेज मालक
दिवसभरात वाहने दुरुस्त करून मिळालेल्या मजुरीवर कुटुंबांचा गाडा चालतो. सुरुवातीला गॅरेज बंद होते. आता काही तास सुरू असते; परंतु या वेळेत खूपच कमी वाहनांची दुरुस्ती करणे शक्य होते. त्यामुळे तेवढेच पैसे मिळतात. जितकी वाहने दुरुस्त केली तितके जास्त पैसे मिळतात. सध्या वाहनांची संख्या कमी झाल्याने अडचण आहे.
- नईम पिंजारी, कारागीर.