लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची आशा मावळली आहे. मजूर, मेंढपाळ स्थलांतरीत झाले आहेत. पाणी, चाºयाअभावी जनावरांना गुरे बाजाराची वाट धरावी लागत आहे. ठोस उपाययोजना करण्याची गरज असताना अजून शासनाकडून पाहणी दौरे सुरु असल्याने ही शेतकºयांची थट्टा सुरु असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व पशुपालकांमध्ये व्यक्त होत आहे. मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे, कर्ले, परसोळे, देवी, सतारे, रुदाणे, वाडी आदी भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. येथील मजूर, मेंढपाळ, पशुपालक स्थलांतरीत झाल्याने गावे ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. देवकानगर गाव तर संपूर्ण खाली झाले आहे. चुडाणे येथे दोन वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पावसाळ्यातही हिच स्थिती होती. चाºयाला जिल्हा बंदी करण्यात आल्यामुळे पैसे देऊनही चारा उपलब्ध होत नाही. यामुळे पशुपालकांना जनावरांसह बाजाराची वाट धरावी लागत आहे. केंद्र शासनाचे दुष्काळी पहाणी पथक नुकतेच जिल्हा दौºयावर आले. दुष्काळग्रस्त वणी व लळींग शिवारातील शेतीची पहाणी करुन शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. मात्र, त्यापेक्षा मालपूर शिवारात भयाण परिस्थिती आहे. पाण्याअभावी गावे ओस पडू लागली आहेत. तब्बल एक तपापासून येथील अमरावती मध्यम प्रकल्प कोरडा ठणठणाट आहे. या प्रकल्पात केंद्राच्या सहाय्याने दुष्काळात महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून पाणी टाकल्यास निम्मा शिंदखेडा तालुका दुष्काळमुक्त होईल, यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे. नुसते दौºयावर दौरे करुन दुष्काळाचे दिवस निघून जातील, हाती काहीच येणार नाही, अशी प्रतिक्रीया शेतकºयांमधून उमटत आहे. याअगोदर संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचे दौरे झाले. पालकमंत्र्यांनी दुष्काळाची पहाणी केली. आता केंद्राचे पथक फिरत आहे. अजून किती दौरे झाल्यावर येथील पशुपालकांना चारा छावण्याचा लाभ मिळेल, असा सवाल पशुपालकांकडून उपस्थित होत आहे. मात्र, तोपर्यंत गोठ्यात पशुधन शिल्लक राहिले पाहिजे, अशी प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहे. जिल्हा चाराबंदी झाल्याने पैसे देऊनही चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरांपुढे काय टाकावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गुरांना जीवंत ठेवण्यासाठी पशुधन विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालपूर परिसरात दुष्काळाचे चटके आतापासूनच बसायला सुरुवात झाली. सततच्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने यावर्षी पेरणी झाल्यानंतर फक्त २६ ते २८ जुलै दरम्यान, एकमेव दमदार पाऊस झाला. यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने नदी, नाले, सर्व जलयुक्त शिवारातील बंधारे कोरडे झालेले दिसत आहेत. विहीर अधिग्रहण, खोलीकरण करुन दिवस काढले जात आहेत. डिसेंबर जेमतेम पार पडेल तर जानेवारीपासून पाणी टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाणीटंचाईचा फटका रब्बी हंगामासाठी बसला आहे. सर्व हंगाम ठप्प असून शेतशिवार ओस पडून असल्याचे चित्र आहे. शेतीपेक्षाही मालपूर परिसरातील बहुतांश भागात गावांसमोर पेयजलाचा प्रश्न अधिक गंभीर स्वरुपात समोर आला आहे. याची संपूर्ण पाहणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व त्यांच्या पथकाने या अगोदरच केली असून त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात. तसेच येथील अमरावती मध्यम प्रकल्पात केंद्राच्या सहकार्याने तापीचे पाणी टाकावे, अशी मागणी होत आहे.
दुष्काळी पाहणी म्हणजे शेतक-यांची थट्टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:10 PM