नागरिकांना शासनाकडून घरकूल योजनेंतर्गत घरे बांधून देण्या येतात. नेर येथेही अनेक घरकुले मंजूर झाली असून त्यांचे बांधकाम सुरू आहे. अनेक घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हे घरकूल बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यानंतर मजुरीसाठी १७ हजार रुपये देण्यात येतात. यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत असलेले ‘ड’ चार मजुरांचे जॉब कार्ड संबंधित यंत्रणेकडे सोपवण्यात येते. त्यानंतर त्यांच्या खात्यावर प्रत्येकी साधारणात: ४२५० इतकी रक्कम मिळते. मात्र अनेक मजुरांकडे अजूनही रोजगार हमी योजनेंतर्गतचे जॉब कार्ड नाही. त्यामुळे अशा मजुरांनी घरकुलाचे काम केले असले तरी त्यांना जॉब कार्डशिवाय मजुरी मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ग्रामपंचायतीत द्यावे जॉब कार्ड...
ज्या मजुरांकडे जॉब कार्ड नाही त्यांना धुळे येथील पंचायत समितीत चकरा माराव्या लागत आहे. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने पंचायत समितीतही अधिकारी व कर्मचारी वर्ग कमी आहे. त्यामुळे मजुरांना अनेक चकरा मारूनही जॉब कार्ड मिळत नाही. त्यामुळे मजुरांना धुळे येथे जॉब कार्डसाठी बोलावण्यापेक्षा नेर ग्रामपंचायतीत एक कर्मचारी पाठवून जॉब कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.