लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील ३८ वर्षाच्या मनोज माळी या युवकाची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद दोंडाईचा पोलिसात करण्यात आली आहे़ दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी मनोजचा राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा आरोप करीत त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता़ पोलीस अधिकाºयांनी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावरुन गुन्हा दाखल करुन आणि योग्य ते कारवाई करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला़ दोंडाईचा येथून जवळच असलेल्या रामी येथील मनोज उत्तम माळी (महाजन) या ३८ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला़ त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत्यूचे कारण समजू न शकल्याने दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती़ त्यानंतर मृतकाचे नातेवाईक व राजकीय कार्यकर्त्यांनी मनोज माळीचा मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली़ तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला़ घटनेचे गांंभिर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, शिरपूर विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, दोंडाईचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहचले़ त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा केली़ यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल मागविण्यात आला आहे़ तो प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले़दरम्यान मृताचे नातेवाईक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार दोंडाईचा ऐवजी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले़ तज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन केल्यानंतर मृताचे मरणाचे कारण समजणार आहे़ शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू नैसर्गिक कारणाने का इतर कारणाने झाला हे समजणार आहे़ त्या नंतर योग्य कलमानव्ये गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले़ दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे़ दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शरीरावर जखम नाहीमृत झालेल्या तरुणास बाहेरून कोणतीही जखम दिसत नाही़ दृश्य स्वरूपात कोणतीही जखम अगर मार लागल्याचे दिसत नसल्याने हृदय विकाराचा झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस व वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत़ तरी देखील शवविच्छेदन अहवालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे़ परिणामी अहवालाकडे आता लक्ष असेल़ पोलीस अधीक्षकांची भूमिकातरुणाच्या मृत्यूचे कारण समजू शकत नसल्याने प्रथम दर्शनी दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू हा नैसर्गिक कारणाने का घातपाताने कळणार आहे़ त्यानंतर योग्य त्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले़
रामी येथील तरुणाचा राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 5:36 PM