कापडणे : गावात ७० लाख रुपये खर्चून ग्रामदेवता भवानी मातेचे मंदिर बांधण्यात आले. त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महिनाभरापूर्वीच करण्यात आला. याच भवानी मातेचा यात्रोत्सव अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी ८ मे रोजी होणार आहे. दरम्यान, येथील भात नदी पात्रात व मुख्य प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, भवानी चौक परिसर व भात नदी पात्र स्वच्छ करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गावाच्या प्रवेशद्वाराजवळच नदीपात्रात व परिसरात घाणीचे व दलदलीचे साम्राज्य आहे. त्यामुळे गावात येणाऱ्यांचे स्वागतच या घाण, दुर्गंधीने होते. दलदलयुक्त घाणीच्या साम्राज्याभोवती ग्रामदेवता भवानी मातेचे मंदिर, गावाचे प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गावाची ऐतिहासिक गढी, जैन समाजाची दोन मंदिरे आहेत. ८ मे रोजी होणारा भवानी मातेचा यात्रोत्सव याच परिसरात होणार आहे. स्वच्छतेसंदर्भात ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.प्रवेशालाच घाणीचे स्वागतकापडणे गावाचा मुख्य भाग म्हणून गावातील भात नदीचा चौक समजला जातो. या भागात नदीच्या पात्रातच घाणीचे साम्राज्य आहे. नदीच्या पूर्व दिशेला ५० फूट अंतरावर कापडणे गावाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. गावातील प्रत्येक ग्रामस्थ व बाहेरगावावरून येणारी-जाणारी पाहुणेमंडळी या भात नदीवर बांधलेल्या पुलावरून प्रवेशद्वारातून गावात प्रवेश करतात. मात्र, या प्रवेशद्वाराजवळच भात नदीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.मांस विक्रेत्यांकडून कळसयाच ठिकाणी मांस विक्रेत्यांची दुकाने आहेत. हे विक्रेते कोंबडीचे पिसे, माशांचे खवले आदी घाण दररोज सकाळ-संध्याकाळ येथेच फेकून देतात. कोंबडीचे पिसे अक्षरश: रस्त्यावर उडत असतात. त्यामुळे येथील घाणीच्या साम्राज्यात भरच पडत आहे. तसेच यामुळे येथे वराह व श्वानांचा अधिक वावर राहत असल्याने मोठा त्रास होत आहे. मांस विक्रेत्यांचे योग्य जागेत पुनर्वसन झाले तर येथील स्वच्छतेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.नदीपात्रात काटेरी झाडे निर्माण झाली आहे. संपूर्ण गावाचे सांडपाणी याच भागातील नदीच्या पात्रातून वाहून जात असते. मात्र, नदीपात्रात मोठया प्रमाणात घाण, केरकचरा साचल्याने हे सांडपाणी येथे नेहमीच साचलेले राहते. सांडपाणी वाहत नसल्यामुळे येथे दलदलीचे स्वरूप तयार झालेले आहे. या घाण व सांडपाण्यामुळे सर्वत्र डास, मच्छरांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. याचा दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र, येथील परिसरात ग्रामपंचायतीने अनेक दिवसांपासून साफसफाई केलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने सदर परिसर कायमस्वरूपी स्वच्छ करावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
मुख्य प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:03 PM