धुळे: बँकेतून मॅनेजर बोलत असल्याची बतावणी करून महिलेच्या बँक खात्यातून २ लाख २६ हजार २९८ रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा हा प्रकार शुक्रवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास घडला. देवपुरातील वलवाडी येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत राहणाऱ्या वृषाली महारू पाटील (वय २७) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी वृषाली पाटील या घरी असताना त्यांना एक फोन आला. आयडीएफसी बँक शाखा पिंपरी, चिंचवड पुणे येथून मॅनेजर बोलत असून तुमच्या खात्यातून यूपीआय अर्थात ऑनलाइन प्रणालीद्वारे ५० हजार रुपये विड्रॉल करण्यासाठी तीन वेळा विनंती आलेली आहे.
सदरची विनंती आम्हाला काहीतरी फसवणूक वाटत आहे. सदरची विनंती तुम्ही केलेली आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावर वृषाली यांनी आपण कोणतीही विनंती केली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर हे बँक खाते महिलेच्या परवानगीने ब्लाॅक करण्यात आले. त्यानंतर वृषाली यांच्या मोबाइल फोनवर थोड्याच वेळात त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून २ लाख २६ हजार २९८ रुपये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतल्याचे मॅसेज प्राप्त झाले. यावर बॅक खात्याशी संबंधित असलेल्या माहितीच्या आधारे बँक खात्यातून ऑनलाइनद्वारे पैसे परस्पर काढून फसवणूक केल्याचे समोर येताच महिलेने सायबर पोलिस ठाणे गाठत शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.