धुळे : खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात कमी केल्याने वेगवेगळ्या तेलाचे दर १० ते १५ रुपयांनी कमी झाले आहेत.
साेयाबीन तेलाचे दर प्रतिलिटर १४५ वरून १३५ रुपयांवर आले आहेत. १० रुपये किंमत कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास ९० टक्के कुटूंब या तेलाचा वापर करतात. त्यापाठोपाठ सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाचा वापर होतो. शेंगदाणे तेलाचे दर कमी झाले नसून १६५ रुपयांवर स्थिर आहेत. त्यामुळे शेंगदाणा तेल वापरणाऱ्या गृहिणींचा हिरमोड झाला आहे. तर सूर्यफूल तेलाचे दर १५ रुपयांनी कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात १७० रुपयांवर गेलेले हे तेल आता १५५ रुपयांपर्यंत खाली आले आहे. करडी, पामतेल, मोहरी, तीळ या तेलांना फारशी मागणी नाही. परंतु त्यांचे दरही कमी झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आता सोयाबीनची आवक वाढणार असल्याने या तेलाची दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. परंतु आगामी काळात सणासुदीमुळे खाद्यतेलाची मागणी वाढू शकते. त्यामुळे दर देखील वाढू शकतात.
म्हणून दर झाले कमी
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे १० ते १५ रुपयांची घसरण झाली आहे. सोयाबीनची आवक वाढणार असल्याने तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. - महेश शेंडे, व्यंकटेश मार्केट, धुळे
किराणा खर्चात बचत
कोरोना काळात खाद्यतेलाचे दर वाढले होते. त्यामुळे स्वयंपाक घराचा बजेट कोलमडला होता. इतर साहित्यात काटकसर करावी लागली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून तेलाचे दर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. - मंगलाबाई पाटील, साेनगीर
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून स्वयंपाक घरातील सर्वच वस्तुंचे दर वाढत आहेत. गॅस, भाजीपाला महागला आहे. आता तेलाचे दर काहीसे कमी झाले आहेत. आणखी कमी होणे अपेक्षित आहे. इतर वस्तुंचा भाव देखील कमी झाला पाहिजे. - आकांक्षा सोनवणे, धुळे