शिरपूर : तालुक्यातील दुर्गम भागातील टेंभेपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खारेपाडा या गावात अद्यापही चिमुकले उघड्यावर शिक्षण घेत आहेत़ पाड्यावर अंगणवाडी इमारत नसल्यामुळे त्यांना उघड्यावरच लिबांच्या झाडाखाली शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत़खारेपाडा गावाची लोकसंख्या ७५० असून गावात शिक्षणाकरीता जिल्हा परिषदेची पहिलीपासून चौथीपर्यंत शाळा आहे़ मात्र चिमुकल्यांसाठी कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे मुले सैरवेर भटकतात़ ग्रामस्थांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २००६ पासून गावात एका लिबांच्या झाडाखाली अंगणवाडी भरते़पावसाळ्यात एका कुडाच्या झोपडीत अंगणवाडी भरते़ सद्यस्थितीत या अंगणवाडीत ५३ मुले व ५४ मुली असे एकूण १०७ मुलांना उघड्यावर शिक्षण देण्याचे काम जवळील खाऱ्या दोंदवाडा येथील बबिता कालूसिंग पराडके या करीत आहेत़गेल्या ३ वर्षापासून वारंवार पंचायत समिती व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी भेटून अंगणवाडी इमारत बांधकामाची मागणी केलेली आहे़ मात्र, अद्यापपर्यंत त्या मागणीची पुर्तता न झाल्यामुळे अद्यापही चिमुकले उघड्यावरच शिक्षण घेत आहेत़२१व्या शतकात देश तंत्रज्ञानच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे़ अगदी अवकाशात भरारी घेत आहे़ डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजच्या नावाने पुढे जात असताना आदिवासी भागात मात्र समस्या जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. टेंभेपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या खारेपाडाच चित्र खूपच दयनीय आहे़ अजूनही या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी साधी खोली नाही. हे मुले उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असो बाहेर बसूनच ज्ञानर्जन करीत आहेत़ तब्बल १०७ मुले या अंगणवाडी केंद्रात आहे़ अशा परिस्थितीतही बबिता पराडके या अंगणवाडी सेविका मात्र, प्रामाणिकपणे सेवा देत आहे़ ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही या ठिकाणी खोली बांधकाम अद्यापपर्यंत मंजूर झालेले नाही़ मुलांचे भवितव्य धोक्यात असतांना प्रशासन मात्र, आदिवासी भागातील समस्यांबाबत अनभिज्ञच असल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे़
चिमुकल्यांना उघड्यावर शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:59 AM