लोकमत न्यूज नेटवर्कनरडाणा : शिंदखेडा पंचायत समितीचा कृषी विभाग आणि नरडाणा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नरडाणा गावात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली़अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, रेशन दुकान, कृषी सेवा केंद्र, दवाखाना, मेडीकल, बँका आदी ठिकाणी जनजागृतीपर माहिती पत्रके लावून प्रात्यक्षिके दाखविण्यात आली़ यावेळी नरडाणा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे, संपर्क अधिकारी तथा कृषी विस्तार अधिकारी गिरीधर देवरे, डी़ बी़ पाटील, ग्रामविकास अधिकारी विजय सैंदाणे, सरपंच मन्साराम बोरसे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिसोदे उपस्थित होते़गावात विविध ठिकाणी प्रात्यक्षिके दाखवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यात आली़ आवश्यक कामासाठी बाजारात आणि बँकांमध्ये आलेल्या महिलांना तसेच ग्रामस्थांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले़ सार्वजनिक ठिकाणी कोण्याही जागेवर हाताचा स्पर्श करु नये, वेळोवेळी किमान वीस सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवावे, नाकातोंडाला आणि डोळ्यांना हात लावू नये, बाहेर पडताना नेहमी मास्क किंवा रुमाल वापरावा, वृध्दांची आणि लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी केले़सध्या जनधन योजनेचे पाचशे रुपये, पीएम किसान, संजय गांधी निराधार आदी विविध योजनांचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत़ त्यासाठी बँकांमध्ये महिला पुरुषांची गर्दी होत आहे़ बॅकांच्या विविध शाखांवर जावून गर्दी न करण्याचे आवाहन केले़ बॅकांनी गावनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे़त्यानुसार नागरीकांनी बँकेत यावे़ कोरोना विषाणूच्या या लढ्यात नागरीकांनी घरात राहूनच सहकार्य करावे, असे आवाहन शिंदखेडा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गिरीधर देवरे, ग्रामविकास अधिकारी विजय सैंदाणे यांनी केले़
नरडाण्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 9:25 PM