जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हा मेळावा होईल. यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच मोबाइल दूरध्वनीद्वारे होतील, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. रा. रिसे यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे काही औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. या आस्थापनांमधील परप्रांतीय, स्थानिक कामगार, मजूर आपापल्या गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. आता शासनाने काही अटी व शर्तींच्या अधीन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापनांना व्यवसाय, उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे; मात्र काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे संकेतस्थळावर ऑनलाइन अधिसूचित करण्यात येणार आहेत.
काैशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या आणि मेळाव्यास ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सवर तसेच मोबाइल, दूरध्वनीद्वारे मुलाखती होतील. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास संकेतस्थळावर किंवा ॲण्ड्राइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून महास्वयं ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी, तसेच मेळाव्यातील उपलब्ध रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावेत.
इच्छुक उद्योजकांनी रिक्त पदे विभागाच्या संकेतस्थळावर पंडित दीनदयाळ उपाध्याय जाॅब फेअर ऑप्शनवर क्लिक करून धुळे ऑनलाइन जाॅब फेअर दोन यामध्ये अधिसूचित करावीत. याबाबत काही अडचण असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. रोजगार मेळावा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कार्यालयात किंवा नियोक्त्यांकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.