मनीष चंद्रात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दिवसागणिक वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे वन व जंगलांची हानी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यामुळे वन व पर्यावरण संवर्धन आज काळाची गरज झाली आहे. या विचाराने शहरातील महाराणा प्रताप विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सीड बॅँक’ या उपक्रमाद्वारे गेल्या दहा वर्षांपासून वनसंपदा फुलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. जंगल व वनसंपत्ती कमी होत असल्याने हल्ली वातावरणात बदल जाणवताना दिसू लागला आहे. ही बाब चिंतेची आहे. त्याचा सर्वंकष विचार करता शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करून त्यांच्याकडून बीजारोपण करून घेण्यासाठी शहरातील महाराणा प्रताप विद्यालयाने गेल्या दहा वर्षांपूर्वी ‘सीड बॅँक’ हा उपक्रम सुरू केला. या शाळेतील राष्टÑीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे. २००८ पासून उपक्रमास प्रारंभ २००८ साली सामाजिक वनीकरण विभागाने ‘बी संकलन’ स्पर्धा आयोजित केली होती. आपल्याकडे वेगवेगळ्या ऋतूत निरनिराळी फळे येतात. ती खाल्यानंतर या फळांच्या बिया फेकून दिल्या जातात. या बियांचे संकलन करून त्या बियांचे रोपण केले तर वन संपदेत वाढ होऊ शकते, या विचाराने ही स्पर्धा घेतली होती. त्यानंतर महाराणा प्रताप शाळेत राष्टÑीय हरित सेनेचे विभाग प्रमुख डॉ. किशोर अरगडे यांनी हा उपक्रम शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापिका एस. एस. भंडारी व संचालक मंडळाच्या मदतीने सुरू ठेवला. आजतागायतही हा उपक्रम सुरू आहे. वनसंपेदत वाढ करणे.
वनसंपदेचे संगोपन करणे या विचाराने ‘सीड बॅँक’ हा उपक्रम सुरू केला आहे. आपण जी फळे खातो, त्या फळातील बिया फेकून देतो. परंतु, या फेकलेल्या बिया आपण संकलित करून त्याचे रोपण केले तर वनसंपदेत वाढ होऊ शकणार आहे. - डॉ. किशोर अरगडे, हरित सेना प्रमुख , महाराणा प्रताप विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे.