धुळे : शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. याठिकाणी विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी येत असतात. मात्र काही ठिकाणी ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्याचे प्रकार घडतात. ही एक माननिक विकृती असून, असे प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी येथे केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि धुळे एज्युकेशन सोसायटीचे पालेशा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंधासाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. आरती सपकाळे होत्या. डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले की, रॅगिंग झालेले कितीतरी तरुण तरुणी एकतर कायमचे तणावात जातात. त्यांच्या जीवनाच्या मूळ उद्देशापासून भरकटतात. रॅगिंग विरोधात देशात सक्षम कायदा असूनही काही ठिकाणी रॅगिंगसारख्या घटना घडत आहेत. रॅगिंग झालेले विद्यार्थी आणि रॅगिंग करणारे विद्यार्थी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात ४० टक्के लोकांना समुपदेशनाची गरज आहे. समुपदेशन झाल्यास कितीतरी वाईट घटना टळू शकतील. सूत्रसंचालन प्रा. निकुंभ यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ. शोभा चौधरी, प्रा. गणेश सपकाळे, यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेला विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅगिंगसारखे प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:27 PM